मराठी कविता.....• » мαяαтнι ρσєм « •

आपल्या कविता (एक संग्रह) !! इत्यादी !!!!!!!

हिवाळ्याचे दिवस.. शिशिर ऋतूला नुकतीच सुरुवात झालेली. प्रत्येक लहानमोठय़ा झाडांमधून काही पिवळी पाने डोकावताना दिसली आणि माझ्या नजरेला ती जरा खटकलीच. झाडांचे आणि एकूणच सगळ्या बागेचे निखळ हिरवे सौंदर्य त्यामुळे कमी होत आहे, असे जाणवून मी भराभर सगळी पिवळी पाने झाडापासून वेगळी करून एका टोपलीत जमा केली. समाधानाने परत सगळ्या झाडांवर नजर टाकली, पण तरीही नजर अतृप्तच होती. पिवळी पाने काढल्यानंतर झाडे काहीशी रिकामी वाटू लागली. वाटलं की, पिवळ्या पानांमुळे झाडांची शोभा वाढत नसली तरी झाडे कशी समृद्ध आणि अनुभवी वाटत होती. उगीचच काढली आपण ती पिवळी पाने! आपोआप गळून पडली असती तेव्हा पडली असती. नंतरही कितीतरी दिवस मन खंतावतच होते. काही दिवसांनी काढून टाकलेल्या पानांच्या जागी कोवळी पालवी डोलताना दिसली आणि मी खूश झाले. पिवळ्या पानांचे दु:ख हळूहळू कमी झाले. पण तेव्हापासून ठरवले, मुद्दाम पिवळी पाने कधीच काढायची नाहीत.
मध्यंतरी एकदा एका वृद्धाश्रमाला भेट दिली. तिथे असलेल्या सगळ्या वृद्धांच्या चेहऱ्यावर एक उदास भाव दिसत होता. वर वर जरी ते आमच्याशी हसून बोलत होते, तरी त्यांच्या अंतर्मनात काहीतरी सलत असावे असे वाटून गेले. एकदा वाटलं त्यांच्यापैकी कोणाशी तरी बोलावं, त्यांच्या भावना समजून घ्याव्या, पण मग परत एकदा विचार केला, काय बोलणार ते तरी? काय सांगू शकणार होते? उगीच त्यांच्या जखमांवरची खपली मात्र निघायची, त्यापेक्षा आपणच समजून घेतले पाहिजे.
वृद्धाश्रमातून निघता निघता मला पुन्हा एकदा टोपलीत पडलेल्या पिवळ्या पानांची आठवण झाली. येथील सगळी वृद्ध मंडळी म्हणजे टोपलीत काढून टाकलेल्या पिवळ्या पानांसारखीच होती. पुन्हा पुन्हा कुसुमाग्रजांच्या ओळीच आठवत राहिल्या- ‘जीर्ण पाचोळा पडे तो उदास..’
मागच्या वर्षी कुंभमेळ्यात हरवलेल्या अनेक वृद्ध व्यक्ती, काही वृद्ध जोडपी आपापल्या मुलांना शोधत होती. दूरच्या प्रश्नंतातून आलेली ही मंडळी इथल्या अनोळखी प्रदेशात आधीच कावरीबावरी झालेली असताना तो चेंगराचेंगरीचा भयंकर प्रकार घडला आणि अक्षरश: पालापाचोळ्यासारखी माणसे इतस्तत: विखुरली गेली. अगतिक आई-बाप दूरदर्शनवरून आपल्या मुलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होती. पोलिसांना आपापल्या भाषेत विनवत होती, मुलांपर्यंत पोचण्याची केविलवाणी धडपड करत होती. पण खरी परिस्थिती फार वेगळी होती. कल्पनेपलीकडची होती. काही मुलांनी आपल्या म्हाताऱ्या आई-वडिलांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते. नकोशा झालेल्या आई-वडलांना मोठय़ा धूर्तपणे कुंभमेळ्यात आणून सोडून दिले होते. ही मुलं इतकी कृतघ्न का?
पन्नाशीत आल्यावर माझ्या मनात एक कल्पना सहज डोकावली. आपल्या वयोगटाचा ग्रुप तयार करायचा आणि स्वत:चे एक सोनेरी विश्व तयार करायचे. जमल्यास एकत्र राहायचे. जवळपास घरे घेऊन राहायचे. कारण पन्नाशीत संसाराची हौस बऱ्यापैकी भागलेली असते, मुलांचा हात सुटून ती मार्गाला लागलेली असतात. त्यांना त्यांचे एक वेगळे विश्व सापडलेले असते. आपल्याही प्रकृतीच्या काही न काही तक्रारी सुरू झालेल्या असतात. कोणाला बी.पी., कोणाला डायबेटिस, कोणाला गुडघेदुखी इ. त्यामुळे शारीरिक मर्यादाही आलेल्या अरसतात. त्यातून मुले बाहेरगावी, परदेशात असली तर घरात दोघे नवरा-बायकोच उरतात. मग गाण्याची, चित्रकलेची किंवा वाचनाची आवड असलेल्यांना एकत्र येऊन वर्षभर निरनिराळे कार्यक्रम आखायचे. कधी कुठे चांगला कार्यक्रम असला की एकत्र मिळून जायचे. ही कल्पना बऱ्याचजणींना आवडलीय. ती पुढे कितपत सरकते ते बघायचे.
पाने पिवळी तर होणारच आहेत, ती गळूनही पडणार आहेत, पण असे काही ठोस ठरवल्यास त्यांना टोपलीत पडण्याची भीती वाटणार नाही. कारण त्यांचेच एक सोनेरी विश्व तयार होऊ शकेल. नंतर कधीतरी हिरव्या पानांनाही त्याचे महत्त्व कळणारच आहे आणि झाला तर त्याचा फायदा होणार आहे. कारण जेव्हा त्यांच्यावर वेळ येईल तेव्हा हे सोनेरी विश्व त्यांच्या स्वागतालाही तयार असेल!

0 comments:

Post a Comment

• » मराठी कविता « •

About this blog

About Me

• » ι ℓσνє мυѕι¢,ѕнαソαяι,gαzαℓѕ,ѕмѕ,ρσєтяソ &αмρ; мαкє @ ηєω ƒяιєη∂ѕ... « •

Member

Blog Archive

Blog Archive